चीनमधील छळछावण्या उघड करणाऱ्या राजगोपालन यांना पुरस्कार

चीनमध्ये उगुर मुस्लिमांच्या छळ छावण्यांचा पर्दाफाश करणाऱ्या भारतीय वंशाच्या बझफीड न्यूजच्या पत्रकार मेघा राजगोपालन यांना यंदाचा अभिनव शोधपत्रकारितेचा ‘पुलित्झर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

राजगोपालन या बझफीड न्यूजच्या पत्रकार असून भारतीय वंशाच्या ज्या दोन पत्रकारांना हा पुरस्कार मिळाला त्यात त्यांचा समावेश आहे. टंपा बे टाइम्सचे नील बेदी हे स्थानिक वार्तांकन करतात, कॅथलनी मॅकगोरी यांच्यासमवेत संभाव्य गुन्हेगार शोधून काढणाऱ्या नगरपालांच्या एका योजनेचा पर्दाफाश त्यांनी केला होता.

श्रीमती राजगोपालन यांनी चीनच्या शिनजियान प्रांतातील  एका छळ छावणीला भेट दिली होती. राजगोपालन यांनी सांगितले, की धोका असतानाही जे लोक आपल्याशी तेथील छळछावण्यांमधील परिस्थितीबाबत बोलले त्यांचेही त्यांनी आभार मानले.

काही महिने या तिघांनी चीनच्या निर्बंध नसलेल्या सॉफ्टवेअरमधून चीनच्या प्रतिमा मिळवल्या. एकूण ५० हजार ठिकाणांच्या प्रतिमा त्यात आहेत. अनेक ठिकाणी दहा हजारांच्या आसपास अनेक लोकांना छोट्या जागेत कोंबण्यात आले होते, तर काहींना सक्तीने काम करायला लावले जात होते. यात वार्तांकनाच्या तंत्रज्ञानात्मक बाबींचे महत्त्व सामोरे आले आहे. चीनमध्ये येण्यास बंदी केल्यानंतर राजगोपालन यांनी  शेजारी असलेल्या कझाकस्थानमध्ये प्रवास केला होता. त्यांनी शिनजियांग येथील छळछावण्यात असलेल्या किमान २४ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

चीनकडून व्हिसा रद्द

बझफीड न्यूजने म्हटले आहे, की चीनने सुरुवातीला अशा छळ छावण्या असल्याचा इन्कार केला होता. या सगळ्या प्रक्रियेत राजगोपालन यांचा व्हिसा रद्द करून त्यांना चीनबाहेर  हाकलण्यात आले होते. शिनजियांग प्रांतातील काही ठिकाणी पाश्चिमात्य लोक व पत्रकारांना प्रवेश निषिद्ध असून राजगोपालन यांनी तेथील छळ छावण्यात जे काही चालते त्याचे वर्णन केले होते. राजगोपालन यांच्यासमवेत अ‍ॅलिसन किलिंग यांनी न्यायवैद्यक विश्लेषणाचे काम केले होते. उपग्रह प्रतिमांचा अर्थ समजून सांगितला होता. ख्रिस्तो बुशचेक यांनी विदा पत्रकार म्हणून प्रोग्रॅमरचे काम केले होते.