जगातील पन्नास कोटी फेसबुक खातेदारांची माहिती संकेतस्थळावर आली असून माहिती हॅकर्सकडून वापरण्यात येण्याची शक्यता आहे. ही माहिती काही वर्षे जुनी असून फेसबुक खातेदारांची माहिती गोळा करीत असल्याचा हा प्रकार संतापजनक मानला जात आहे यात शंका नाही. फेसबुकच नव्हे तर इतर समाजमाध्यमेही अशा प्रकारे वापरकर्त्यांची माहिती जमा करून त्याची विक्री करीत असतात. एक प्रकारे समाजमाध्यम खात्यावरील माहिती चोरीस जात किंवा विकली जाते  हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हा माहिती संच संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती प्रथम बिझिनेस इन्सायडरने दिली आहे. त्या प्रकाशनाने म्हटले आहे, की आमच्याकडे १०८ देशांतील वापरकर्त्यांची माहिती आली असून त्यात फोन क्रमांक, फेसबुक आयडी, पूर्ण नावे, ठिकाण, जन्मतारीख, इमेल पत्ते यांचा समावेश आहे. फेसबुक माहिती सुरक्षेसाठी धडपडत असताना त्यांनी २०१८ मध्ये एक महत्त्वाची सुविधा रद्द केली होती. त्या सुविधेच्या मदतीने दुसऱ्याची माहिती फोन क्रमांकाच्या माध्यमातून शोधता येत असे. यातून केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका या राजकीय माहिती आस्थापनेने ८ कोटी ७० लाख फेसबुक वापरकर्त्यांंची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय गोळा केली होती.

डिसेंबर २०१९ मध्ये युक्रेनच्या माहिती सुरक्षा संशोधकांनी असे म्हटले होते, की फेसबुक वापरकर्त्यांचे फोन क्रमांक, आयडी असा माहिती संच सापडला होता. एकूण २ कोटी ६७ लाख लोकांची ही माहिती होती. ती इंटरनेटवर खुलेपणाने उपलब्ध होती. अलीकडे सापडलेल्या माहितीचा त्या माहितीसंचाशी काही संबंध आहे का याचा तपास केला जात आहे.

फेसबुकचा दावा

कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथे मुख्यालय असलेल्या फेसबुकने म्हटले आहे, की आताची जी माहिती सापडली आहे ती, २०१९ मधील आहे. आम्ही ऑगस्ट २०१९ मध्येच माहितीची चोरी होणार नाही अशी सुविधा फेसबुक खात्यांमध्ये दिली आहे.