देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित न राहण्याची मुभा द्यावी, इतका कोणताही गंभीर आजार पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलेला नाही, असा युक्तिवाद गुरुवारी न्यायालयात सरकारी वकिलांनी केला.
परवेझ मुशर्रफ यांना २ जानेवारी रोजी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी तेव्हापासून त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आलेली नाही. त्यावरून मुशर्रफ यांच्या प्रकृतीला कोणताही गंभीर धोका नसल्याचे सिद्ध होते. इतकेच नव्हे तर अन्य वैद्यकीय अहवालाचा विचार केल्यास त्यांचे हृदय एखाद्या १८ वर्षांच्या व्यक्तीच्या हृदयाइतकेच कार्यक्षम आहे, असा दावा सरकारी वकील अक्रम शेख यांनी विशेष न्यायालयात केला. रुग्णालय मुशर्रफ यांना स्वत:हून अर्थातच सोडणार नाही, रुग्णालयातून घरी जावयाचे की रुग्णालयात राहावयाचे हा मुशर्रफ यांचा अधिकार आहे, असेही शेख म्हणाले. पाकिस्तानात उत्तम दर्जाची अनेक रुग्णालये आहेत त्यामुळे उपचारांसाठी मुशर्रफ यांना परदेशात पाठविण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.