महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करावी आणि त्यांना पुढील निवडणूक लढवू देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे.
दिल्लीतील वकील निखिलेश पांडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाविरोधात याचिका दाखल केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रक्षोभक भाषणे करतात आणि त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी तोडफोड करतात. त्यामुळे या पक्षाची मान्यता तातडीने रद्द करावी आणि त्यांना पुढील निवडणूक लढवू देऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
याचिकेवर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे. राज्यात टोलच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना टोल न भरण्याचे आणि टोल मागण्यासाठी कोणी आडवा आला, तर त्याला तुडवून काढण्याचे आदेश दिल होते. त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टोलनाक्यांवर तोडफोड करण्यात आली होती. येत्या बुधवारी मनसे राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यावेळीही काही हिंसक घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.