नोटबंदीमुळे वैतागलेल्या नागरिकांना पेट्रोलियम कंपनीने पेट्राल व डिझेलच्या दरात कपात करून मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल १ रूपया ४६ पैशांनी तर डिझेलच्या दरात एक रूपया ५३ पैशांची कपात करण्यात आली आहे. नवे दर आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

आठवडाभरापूर्वीच म्हणजे दि. ५ नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांच्या आतच दर कमी झाले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. ऑक्टोबरमध्ये दोन वेळा, तर सप्टेंबरमध्येही १६ तारखेला पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते.

देशातील इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या दर १५ दिवसांनी इंधनाच्या किंमतींचा आढावा घेतात. त्यानुसार दर महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेस बदललेले दर जाहीर केले जातात. ५ नोव्हेंबर रोजी दरात किरकोळ बदल करण्यात आले होते. त्यानंतर १० दिवसांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.

आज मध्यरात्रीपासून बदलणारे दर
पेट्रोल (प्रतिलिटर) : मुंबई : ७२.२९, पणजी : ६१.५९, दिल्ली : ६५.९३, कोलकाता : ६८.६७, चेन्नई : ६५.४१, बंगळूर : ७२.५६.