वाढत्या इंधनदराचा विरोध करण्यासाठी सोमवारी काँग्रेससह विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र पेट्रोल ५५ रूपये दराने मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल कारखाना सुरू करणार आहे. त्याच्या मदतीने डिझेल ५० रूपये तर पेट्रोल फक्त ५५ रूपये मध्ये मिळेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल तयार करण्यासाठी देशात पाच प्लांट सुरू करत आहे. लाकडी वस्तू आणि कचऱ्यापासून इथेनॉल बनवले जाईल. यामुळे डिझेल ५० रूपये तर पेट्रोल ५५ रूपयांमध्ये मिळू शकेल.

मोठ्याप्रमाणात होत असलेल्या इंधन आयातीबाबत गडकरी म्हणाले की, आपण सुमारे ८ लाख कोटी रूपयांचे डिझेल आणि पेट्रोल आयात करतो. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रूपयाचे अवमूल्यन होत आहे. मी मागील १५ वर्षांपासून म्हणत आहे की, शेतकरी आणि आदिवासी जैव इंधन बनवू शकतात. त्याचा वापर करून एअरक्राफ्टही उडवले जाऊ शकते. आमच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतकऱ्यांकडून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलने वाहनेही चालवता येऊ शकतील. दरम्यान, इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे.