बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी सत्ताधारी जनता दल (यू)-भाजप आघाडीत पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीच्या सहभागाबाबत अद्यापही अनिश्चितता असून, विरोधकांमध्येही अजून ताळमेळ साधला गेलेला नाही. लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाबद्दल मित्रपक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यामुळे विरोधकांच्या महाआघाडीत कोण सहभागी होणार, हेसुद्धा स्पष्ट झालेले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

बिहारमध्ये नितीशकु मार यांचा जनता दल (यू), भाजप आणि लोक जनशक्ती पार्टी यांच्या युतीचे सरकार सत्तेत आहे. जनता दल (यू) आणि भाजपमध्ये अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी समसमान जागा लढविल्या होत्या. विधानसभेतही हेच सूत्र कायम असावे, अशी भाजप नेत्यांची मागणी आहे. जनता दलाची त्याला तयारी नाही. नितीशकु मार हे मोठय़ा भावाची भूमिका बजावतील, असे जनता दलाने आधीच स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पुत्राने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा पण नितीशकु मार यांना विरोध, अशी भूमिका चिराग पासवान यांनी मांडली. चिराग पासवान यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून टाकली. तसेच विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले.

पासवान यांनी जनता दल (यू) च्या विरोधात उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. भाजपला पाठिंबा आणि नितीशकु मार यांच्या विरोधात लढण्याचा इशारा देत पासवान यांनी नितीशकु मार यांना विरोध दर्शविला आहे. नितीशकु मार यांच्या पक्षाच्या जागा कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तर दबाव वाढवून चिराग पासवान हे जास्त जागा पदरात पाडून घेतील, असाही अंदाज वर्तविला जात आहे. स्वतंत्रपणे लढायचे असल्यास रामविलास पासवान यांना मंत्रिपद सोडावे लागेल आणि ते पासवान यांना परवडणारे नाही.

दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी गेले वर्षभर निवडणुकीची तयारी केली आहे. राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस युतीतील पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर वेगळी चूल मांडल्याने विरोधकांच्या ऐक्याला आधीच तडा गेला.

माजी मुख्यमंत्री जितनराम मांजी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाने काँग्रेस व लालूपुत्राची साथ सोडून नितीशकु मार यांच्याबरोबर पुन्हा मैत्री केली. तर दोनच दिवसांपूर्वी माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी तेजस्वी यादव यांचे नेतृत्व मान्य नाही, अशी भूमिका मांडली. नेता बदला अन्यथा वेगळे लढण्याचे त्यांनी जाहीर केले.

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये अद्याप जागावाटपाचा तोडगा निघू शकलेला नाही. डाव्या पक्षांनी विरोधकांच्या आघाडीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली असली तरी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.

लालू आणि पासवान पुत्रांची कसोटी : लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी आणि पासवानपुत्र चिराग यांच्या नेतृत्वाची या निवडणुकीच्या निमित्ताने कसोटी लागणार आहे. चिराग पासवान यांना बिहारच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करायचे असून, या निवडणुकीच्या निमित्ताने ते तयारी करीत आहेत. लालूंच्या अनुपस्थितीत तेजस्वी यांना स्वत:चे नेतृत्व प्रस्थपित करायचे आहे.