वायुदलाचे प्रतिपादन; पाकिस्तानचा सद्भावना संकेत मानण्यास नकार

नवी दिल्ली : पाकिस्तानने ताब्यात घेतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतात परत येत असल्याबद्दल आपल्याला आनंद असल्याचे भारतीय वायुदलाने गुरुवारी सांगितले. मात्र हे जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार घडत असल्याचे सांगून, हा पाकिस्तानचा सद्भावना संकेत असल्याचे म्हणणे त्यांनी अमान्य केले.

अभिनंदन  परत येण्याची आम्ही वाट पाहात आहोत, असे वायुदलाचे सहायक प्रमुख एअर व्हाइस मार्शल आर.जी.के. कपूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाकिस्तानने बुधवारी सकाळी केलेला हवाई हल्ला परतवून लावताना वर्धमान यांनी पाकिस्तानच्या दोन एफ-१६ लढाऊ विमानांना खाली पाडले. यानंतर त्यांचे मिग-२१ विमान शत्रूने पाडल्यानंतर ते बाहेर पडले. त्यानंतर ते पाकिस्तानात आहेत, असे कपूर म्हणाले. ‘शांततेचा संकेत’ म्हणून अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका केली जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी संसदेत जाहीर केले.

भारतीय वायुदलाला ही सद्भावनेची कृती वाटते काय, असे विचारले असता आमच्या दृष्टीने हा जिनिव्हा कराराला अनुसरून असलेला संकेत वाटतो, असे उत्तर कपूर यांनी दिले.

लष्कर आणि नौदल यांच्या प्रतिनिधींसोबत एअर व्हाइस मार्शल कपूर हे प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते.

तणाव वाढवण्याचे काम पाकिस्तानने केले आहे, मात्र शत्रूने डिवचल्यास उद्भवणाऱ्या कुठल्याही आकस्मिक घटनेसाठी भारत तयार असल्याचे लष्कराचे मेजर जनरल एस.एस. महल यांनी सांगितले. तर पाकिस्तानने कुठलेही सागरी दुस्साहस केल्यास त्याचा सामना करण्यासाठी नौदल अत्यंत दक्ष आहे, असे भारतीय नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल दलबीरसिंग गुजराल म्हणाले.

हा घ्या पाकिस्तानने एफ-१६ वापल्याचा पुरावा..

पाकिस्तानने बुधवारी भारताच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी एफ-१६ विमानांचा वापर केला, याचा पुरावा म्हणून वायुदलाने यावेळी अम्राम क्षेपणास्त्रांचे काही भाग दाखवले. आपण एफ-१६ विमाने न वापरल्याचे पाकिस्तानने खोटेच सांगितले, मात्र त्याचा पुरेसा पुरावा आहे, असे कपूर यांनी स्पष्टपणे सांगितले.