‘मी भाजपमध्ये जाणार नाही. गांधी कुटुंबाच्या नजरेत मला बदनाम करण्याचा डाव आहे’, असे सांगत राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सचिन पायलट यांनी बुधवारी नरमाई दाखवली. त्याला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, ‘भाजपचा कळप’ सोडण्याचाही आदेश दिला. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्रमक भूमिका घेत सचिन पायलट यांनी भाजपशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे.

राजस्थानच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पालयट व त्यांचे दोन समर्थक मंत्री यांना मंत्रिपदावरून काढून टाकल्यावर, पुढील राजकीय वाटचालीची माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित केलेली पत्रकार परिषद सचिन पायलट यांनी अचानक रद्द केली. मात्र, पायलट यांनी, आपण अजूनही काँग्रेसचाच कार्यकर्ता असून राजस्थानमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी मी अपार कष्ट केले, असे पत्रकारांना सांगितले. सचिन पायलट शनिवारपासून काँग्रेस व अपक्ष समर्थक सुमारे २० आमदारांसह हरियाणातील मानेसरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. सध्या जयपूरमध्ये असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी, काँग्रेस नेतृत्व हे पायलट यांच्या ‘तडजोडी’चा गांभीर्याने विचार करत असल्याचे सूचित केले.

मंगळवारी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी पायलट यांच्याशी फोनवरून थेट चर्चा केली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वतीने त्यांचे दोन विश्वासू नेते पायलट यांच्या संपर्कात होते.

सरकार अजनूही काठावर

राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सचिन पालयटसह १९ बंडखोर काँग्रेस आमदारांना नोटीस बजावली आहे. या आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती काँग्रेसच्या वतीने विधानसभाध्यक्षांना केली होती. त्यामुळे गेहलोत सरकारकडे ८८ काँग्रेस आमदार असून पायलट गटातील आमदारांनी परत यावे यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या गेहलोत सरकारला १०९ काँग्रेस व अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १०१ संख्याबळाची गरज आहे. पायलट यांच्या बंडापूर्वी गेहलोत सरकारकडे १०७ काँग्रेस, १३ पैकी १० अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या ५ अशा १२२ आमदारांचे समर्थन होते. त्यामुळे अजूनही गेहलोत सरकार काठावर उभे आहे.

गेहलोत मात्र आक्रमक

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्याविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली. चांगले इंग्रजी बोलता येणे, प्रसारमाध्यमांसमोर अचूक विधाने करता येणे आणि देखणे असणे म्हणजे पुरेसे नसते. देशाबद्दल तुमच्या हृदयात काय आहे हे महत्त्वाचे. तुमचे राजकीय विचार, धोरणे, कटिबद्धता यांनाही महत्त्व असते, अशी तीव्र टीका गेहलोत यांनी केली. युथ काँग्रेस, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या विविध संघटनांमध्ये ४० वर्षे संघर्ष आम्ही केला, मग काही प्रदेशाध्यक्ष बनले. केंद्रीय काँग्रेसचे महासचिव बनले. ही बाब नव्या पिढीने लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्यावर आमचेही प्रेम आहे. उद्याचा काळ त्यांचाच आहे, असे गेहलोत म्हणाले. गेल्या सहा महिन्यांपासून भाजप काँग्रेस आमदारांचा घोडाबाजार करू पाहात आहे, असा आरोप करत गेहलोत यांनी पालयट यांच्यावर भाजपशी संगनमत करत असल्याचीही टीका केली.

कुटुंबात परत या!

पायलट भाजपमध्ये जाणार नसतील तर त्यांनी हरियाणातील भाजपच्या खट्टर सरकारचा पाहुणचार घेणे थांबवून कुटुंबात (काँग्रेस) परत या आणि जयपूरला निघून या, असा आग्रह सुरजेवाला यांनी  केला. काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर पायलट यांनी आपले म्हणणे मांडावे, ते काँग्रेस नेतृत्व ऐकून घेण्यास तयार असल्याचेही सुरजेवाला म्हणाले. पायलट यांच्याशी काँग्रेस नेतृत्व सातत्याने संपर्क साधत आहे. दोन ज्येष्ठ नेत्यांनी सहा वेळा पायलट यांच्याशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहितीही सुरजेवाला यांनी दिली.