दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलीसांची सुरक्षा घ्यावी, असे त्यांना निर्देश द्यावेत, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी याचिका दाखल करण्यात आली. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून केजरीवाल यांनी स्वतःसाठी कोणतीही सुरक्षा घेतलेली नाही. आपल्याला सुरक्षारक्षकांची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, कौशंबीमध्ये बुधवारी आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर तातडीने ही याचिका दाखल करण्यात आली.
वकील अनूप अवस्थी यांनी ही याचिका दाखल केली. न्या. बी. डी. अहमद आणि न्या. सिद्धार्थ मृदूल यांच्यापुढे यावर सुनावणी झाल्यावर त्यांनी या प्रकरणी याचिका दाखल करण्याचे आदेश दिले.
केजरीवाल हे दिल्ली पोलीस देऊ करीत असलेली सुरक्षा वारंवार नाकारत आहेत. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांच्या जीवितास धोका आहे, असा युक्तिवाद अवस्थी यांनी केला.