पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीक विमा योजनेत शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागत असून दुसरीकडे खासगी विमा कंपन्यांचा फायदा झाला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यात राहुल गांधी यांनी मोदींचा रिपोर्ट कार्डच सादर केला. राहुल गांधी म्हणतात, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे ८ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, पण यात केंद्राचे योगदान शून्य होते. पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पण खासगी विमा कंपन्या नफा कमवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील बुधवारी पीक विमा योजनेवरुन आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दगा दिला असून पीक विमा योजना ही खासगी कंपन्यांसाठी कल्याणकारी योजना झाली आहे. शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून कंपन्या नफा कमवत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावरही आरोप केले होते. गोयल यांचा ४८ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला जात असून त्याबद्दल गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गांधी यांनी केली होती. त्यावर आपण कामदार आहोत नामदार नाही, असा टोला गोयल यांनी लगावला होता.