पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर ब्रिक्स देशांच्या घोषणापत्राच्या ४८ व्या परिच्छेदात दहशतवादाबद्दल चिंतादेखील व्यक्त करण्यात आली. ‘आम्ही आसपासच्या भागांमध्ये पसरत असलेल्या दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त करतो,’ असे घोषणापत्रात नमूद करण्यात आले आहे. ब्रिक्सच्या घोषणापत्रातून लष्कर ए तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा कठोर शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारताकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र भारताच्या प्रयत्नांना चीनकडून अनेकदा खीळ घालण्यात आली. मात्र ब्रिक्सच्या घोषणापत्रात दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याने भारताला मोठे यश मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करुन त्याच्यावर संयुक्त राष्ट्राकडून प्रतिबंध आणले जावेत, यासाठी भारताने अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र अद्याप तरी भारताला यात पूर्णपणे यश आलेले नाही.

सर्व देशांमध्ये शांतता नांदण्यासाठी एकजुटीने राहणे आवश्यक असल्याचे ब्रिक्सच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले. याआधी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचे ब्रिक्सच्या बैठकीत औपचारिक स्वागत केले. चीनमध्ये सध्या ब्रिक्स देशांचे नववे संमेलन सुरु आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा ब्रिक्स देशांमध्ये समावेश होतो. भारत आणि चीनमध्ये दोन महिने डोकलामवरुन तणाव सुरु होता. अखेर दोन्ही देशांनी डोकलाममधील सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डोकलाममधील तणाव निवळला.