उड्डाणक्षम अशी ३६ ‘रफाल’ लढाऊ विमाने फ्रान्सकडून खरेदी करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे जाहीर केला. नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोइस ओलांदे यांची ‘इलिसी पॅलेस’ मध्ये शिखर परिषद झाल्यानंतर उभयतांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
१२६ ‘रफाल’ विमानांची खरेदी करण्यासाठी सुमारे १२ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यवहार गेली तीन वर्षे प्रलंबित होता. भारतातील अवकाशात ही विमाने चालविण्यास कठीण असल्याची बाब लक्षात ठेवून आपण ओलांदे यांच्याशी विचारविनिमय केला आणि त्यानंतर उड्डाणक्षम अशी ३६ विमाने खरेदी करण्याचे मान्य केले, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

महाराष्ट्रातील जैतापूर प्रकल्पास गती देण्यासंबंधीच्या करारावरही उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. जैतापूरचा प्रकल्प उभारण्यासाठी ‘अरेवा’ ही फ्रान्सची कंपनी मदत करणार असून त्यासाठी सहा अणूभट्टय़ा उभारण्यात येतील आणि त्याद्वारे सुमारे १० हजार मेगाव्ॉट वीजनिर्मिती करणे शक्य होईल. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीजेचा खर्च किती असावा, या मुद्यावरून हाही करार लांबणीवर पडला होता.