आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौरा करणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये पंतप्रधान मोदी अनेक योजनांचं भूमिपूजन करणार आहेत. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे ते एका सभेला संबोधित करणार आहेत.

मोदी ट्विट करत म्हणाले, “आसाममधील जनतेमध्ये मोठा उत्साह पाहून आनंद वाटला. उद्या पुन्हा आसामला जाण्याची संधी मिळाली यामुळे मी खूश आहे. आसामच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही काम करत राहू. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी काही फोटोही शेअर केले आहेत. यांमध्ये आसामच्या लोकांकडून त्यांच्या स्वागतासाठी करण्यात येत असलेली तयारी दिसत आहे.

भाजपाच्या ट्विटर हँडलवरुन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मोदी पहिल्यांदा आसाममधील सोनितपूर येथे दोन रुग्णालयांचे भूमिपूजन करतील तसेच ‘असोम माला’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. राज्यातील महामार्ग आणि जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या निर्मितीचा हा कार्यक्रम आहे. सकाळी ११.४५ मिनिटांनी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर मोदी पश्चिम बंगालसाठी रवाना होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये हल्दिया येथे संध्याकाळी चार वाजता ते जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ४.४५ वाजता येथे ते काही महत्वाच्या योजनांचे भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधान दौऱ्याच्या प्रोटोकॉलनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, त्या या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, असं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने तयार करण्यात आलेल्या एलपीजी इम्पोर्ट टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर ढोबी-दुर्गापूर नॅचरल गॅस पाईपलाइन डिव्हिजनचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान उर्जा गंगा प्रकल्पांतर्गत याची उभारणी केली जात आहे.