पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करणारा कारखाना आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला त्यावेळी भारत आता असे हल्ले खपवून घेणार नाही हा संदेश देण्याचा त्यामागे उद्देश होता. आम्हाला शांतता हवी आहे पण त्यासाठी दहशतवादाला खतपाणी घालणे, दहशतवादाची निर्यात अजिबात सहन करणार नाही. त्यांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जाईल. दहशतवाद अजिबात सहन करणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. लंडनमधल्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात, सबके साथ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रश्न-उत्तर असे स्वरुप असलेल्या या कार्यक्रमात एका व्यक्तिने त्यांना सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेताना तुमच्या काय भावना होत्या ? असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी म्हणाले कि, भारताकडे सर्जिकल स्ट्राइकचा हजारो वर्षे जुना इतिहास आहे. भारताने कधीही इतरांच्या भूभागावर डोळा ठेवला नाही किंवा कोणाचा प्रदेश बळकावला नाही. पण कोणी जर दहशतवादाचा कारखाना चालवून आमच्या निरपराध लोकांचा बळी घेत असेल, आमच्या नागरिकांवर हल्ले होत असतील तर अशावेळी त्याच भाषेत कसे उत्तर द्यायचे ते मला चांगले कळते असे मोदी म्हणाले. पाकिस्तानकडे युद्ध लढण्याची क्षमता नसून तो पाठिवर वार करतात असेही मोदींनी सांगितले.

मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकच्या उत्तरावर ‘भारत माता कि जय’ अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या. सर्जिकल स्ट्राईकचे वृत्त सार्वजनिक करण्याआधी आम्ही पाकिस्तान सरकारला याची माहिती देण्यासाठी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही ११ वाजल्यापासून त्यांना फोन करत होतो पण ते फोन उचलत नव्हते. अखेर १२ वाजता आम्ही त्यांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली. त्यानंतर भारतीय प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. भारतीय लष्कराच्या या शौर्याचा आपल्याला अभिमान आहे. हा सर्जिकल स्ट्राईक हा अत्यंत अचूक होता. दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयापूर्वी आपले जवान सुरक्षितरित्या परतले होते असे मोदी म्हणाले.