देशावर ओढवलेल्या संकटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील परिस्थितीविषयी भाष्य केलं. मोदी यांनी देशातील करोना रुग्णसंख्या व अमेरिका, ब्राझील या देशातील परिस्थितीविषयी तुलनात्मक माहिती दिली. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लोकांकडून दुर्लक्ष होत असलेल्या एका गोष्टीवर चिंता व्यक्त केली.

“देशात १२ हजार क्वारंटाईन सेंटर व देशात करोना चाचण्या करणाऱ्या २ हजार प्रयोगशाळा सुरू आहेत. करोना महामारी विरोधातील लढाईत चाचण्यांची वाढती संख्या आमची ताकत आहे. हा काळ निष्काळजीपणा करण्याचा नाही. आता करोनापासून धोका नाही, असं समजण्याचा नाही. विषाणू वाढू नाही, यासाठी काळजी घ्यावी लागेल. काही व्हिडीओ आणि छायाचित्रातून असं दिसतंय की, काही लोकांनी खबरदारी घेणं सोडून दिलं आहे. तर तुम्ही आपल्या कुटुंबाला संकटात टाकत आहात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं,” असं मोदी म्हणाले.

“अमेरिका, ब्राझीलमध्ये करोना रुग्णसंख्या कमी होत होती, पण आता पुन्हा वाढू लागली आहे. जोपर्यंत शेतमाल घरात येत नाही, तोपर्यंत काम पूर्ण होत नाही, असं संत कबीर म्हणून गेले आहेत. त्यामुळे करोनावर लस येत नाही, तोपर्यंत ही लढाई थोडीसुद्धा कमी होऊ द्यायची नाहीये. पहिल्यांदाच जागतिक पातळीवर करोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम होत आहे. भारतातही काही शास्त्रज्ञ काम करत आहेत. जेव्हा करोना लस येईल, तेव्हा ती लवकरात लवकर भारतीयांना मिळेल, यासाठीही काम सुरू आहे,” असं मोदी म्हणाले.

“थोडासा निष्काळजीपणा आपला आनंद हिरावून घेऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत औषध येत नाही, तोपर्यंत निष्काळजीपणा नको. त्यामुळेच मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो आहे की, आपण नियमांविषयी जागृती करण्यासाठी जे कराल ती देशसेवा होईल. वेगानं पुढे जावं हे आवाहन करत सर्व सण उत्सवांसाठी सर्व देशवासीयांना करतो,” असं मोदी म्हणाले.