फार मोठय़ा अपेक्षा ठेवून जग आपल्याकडे पाहत आहे. पण त्याकडे पाहण्यास आपण तयार नाही, अशी ‘छडी’ उगारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात बहुसंख्येने सर्वोत्तम शिक्षक निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. शिक्षक प्रशिक्षण अभियानाची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
शिक्षण क्षेत्रात ज्यांना आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवायचा आहे. त्यांच्यासाठी पाच वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रम केंद्र तयार करेल आणि आपले ध्येयच असे असायला हवे की जगभरातून भारतीय सर्वोत्तम शिक्षकाला मागणी असेल, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले. सुशासन दिनानिमित्त वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातील आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. वाराणसी हा पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे. त्यांनी गुरुवारी तेथे भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, की भारतीय मातीत रुजलेला आणि जगभरात देशाची दिगंत कीर्ती पसरवणारा शिक्षक आपल्याला तयार करता आला पाहिजे. त्याला जगभरातून मागणी असेल.
एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. या शतकावर भारतीय ज्ञानाचा अमीट ठसा उमटवता आला पाहिजे. असे योगदान देणे ही भारताची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि ही काळाची गरज आहे. पंतप्रधान म्हणून गेल्या सहा महिन्यांतील अनुभव असा आहे, की जगाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यासाठी जग आपल्याकडे डोळे लावून आहे. पण त्याकडे पाहण्यास तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले.
रेल्वेचे खासगीकरण नाहीच – मोदी
रेल्वेचे खासगीकरण करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फेटाळून लावली. विदेशी आणि खासगी भांडवल देशातील वाहतुकीचे जाळे सुधारण्यासाठी वापरले जाणार असून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, त्यामुळे लोकांनी त्याबाबत साशंक राहू नये, असे ते म्हणाले. आपण लहानपणी एका रेल्वे स्थानकाजवळ चहा विकत होतो, असे सांगताना आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी त्यांच्या बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला. रेल्वेचे खासगीकरण करण्यात येत आहे, असा गैरसमज पसरला आहे. मात्र, आम्ही रेल्वेचे खासगीकरण करत नाही, हे मी स्पष्ट करतो, असे सांगून मोदी यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनांना या ‘अफवांकडे’ लक्ष न देण्याचे आवाहन केले.