23 September 2020

News Flash

“१३० कोटींपैकी फक्त दीड कोटी भारतीय कर भरतात,” मोदींनी व्यक्त केली निराशा

सर्वांनी चिंतन करणं गरजेचं, मोदींचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

भारतात सध्याच्या घडीला १३० कोटींपैकी फक्त दीड कोटी लोक कर भरत आहेत. यावर आपण सर्वांनी चिंतन करणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. आपलं आत्मचिंतनच आत्मनिर्भर भारतासाठी गरजेचं असल्याचंही ते म्हणाले आहेत. वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी नवी करप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. पारदर्शक करप्रणालीसाठी एक नवं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, जाहीर केली नवी करप्रणाली

“करदात्यांच्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकारलाही करदाता जागरुक राहतील अशी अपेक्षा आहे. २०१२-१३ मध्ये ०.९४ टक्के छाननी होत होती, २०१८-१९ मध्ये हा आकडा ०.२६ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच छाननी होण्याचं प्रमाण जवलळपास चार पटीने कमी झालं आहे. याचा अर्थ बदल किती व्यापक आहे हे दर्शवत आहे. गेल्या सहा ते सात वर्षात टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या अडीच कोटींनी वाढली आहे. पण १३० कोटींच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही वाढ फार कमी झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

“कररचनेत नाहीत पण कर भरु शकतात त्यांनी पुढे येऊन कर भरला पाहिजे. स्वातंत्र्य दिनानिमित्त याचा विचार करा,” असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. “देशातील प्रामाणिक करदाता देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रामाणिक करदात्यासोबत देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचं लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणं योग्य नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे. देशभरात नवे बदल होत आहेत. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

‘या’ त्रिसूत्रीवर आधारित असणार नवीन करप्रणाली; मोदींनी केली घोषणा

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गेल्या काही वर्षात अनेक कायदे रद्द करण्यात आले. सहज व्यवसाय करण्यामध्ये भारत आता ६३ व्या क्रमांकावर आला आहे. यामागे कऱण्यात आलेले अनेक बदल कारणीभूत आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदरांचा विश्वास वाढत आहे. करोना संकटातही रेकॉर्ड गुतंवणूक होणं याचंच उदाहरण आहे”.

“ज्या शहरात आपण राहतो तेथील कर विभाग आपल्या सर्व गोष्टी हाताळतो असं होतं. या नव्या व्यासपीठामुळे कर अधिकाऱ्याची भूमिका बदलली आहे. जर मुंबईमधील एखाद्या व्यक्तीचं करसंबंधी प्रकरण असेल ते मुंबईमधील अधिकारीच हाताळेल असं होणार नाही. ते चेन्नई किंवा इतर शहरातही जाऊ शकते. यामागे फेसलेस टीम असेल. ही टीम कोणती असेल याचा निर्णय संगणकावरुन घेतला जाईल,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 2:08 pm

Web Title: pm narendra modi appeal to pay launch of platform for transparent taxation honoring the honest sgy 87
Next Stories
1 करोना व्हायरसच्या आजाराचं मूळ शोधून काढण्यासाठी थायलंडमध्ये संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेमध्ये
2 अधिकाऱ्यांची ट्रान्सफर नाही, पुराव्यांशिवाय चौकशी करता येणार नाही; कात टाकणार आयकर विभाग
3 भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात
Just Now!
X