माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली.जनतेने टाकलेल्या विश्वासावर मोदी खरे उतरले नाही. त्यामुळे मतदारांचा मोदी यांच्यावरील विश्वास कमी होत चालला आहे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे लोकसभेतील खासदार शशी थरुर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचे शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत मनमोहन सिंग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन समारंभातील भाषणादरम्यान मनमोहन सिंग यांनी मोदींवर टीका केली. मोदींनी ते सर्वांचे पंतप्रधान असल्याचे सांगितले होते. पण जातीय हिंसाचार, जमावाकडून होणारे मारहाणीचे प्रकार आणि गोरक्षकांच्या प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. मोदींच्या कार्यकाळात विद्यापीठातील वातावरण दूषित झाले. सीबीआयसारख्या सर्वोच्च तपास यंत्रणेची प्रतिष्ठा कमी झाली, असे त्यांनी सांगितले.

२०१४ मध्ये मोदींनी जनतेला खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली.पण गेल्या ४ वर्षात सरकारने जनतेचा विश्वासघात केला. आता जनतेचा सरकारवरील विश्वास ढळला, अशी टीका त्यांनी केली.

आर्थिक स्तरावर मोदींनी परदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यादिशेने पावले उचलली नाही. त्यांनी घाईघाईत नोटाबंदीचा निर्णय घेतला. वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घट होऊनही देशातील डिझेल- पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला, अशी टीका त्यांनी केली.

या समारंभातील चर्चासत्रात अरुण शौरीही उपस्थित होते. जनतेला आता जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे. माझ्यामते मोदींचे प्रशासनावर नियंत्रच राहिलेले नाही. सीबीआयमध्ये सध्या जो वाद सुरु आहे यावरुन हेच स्पष्ट होते, असे शौरींनी सांगितले.