अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्याने निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले सख्य आहे. त्यांचा कल भारताच्या बाजूनेच राहिल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) घटक पक्षांची सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. यावेळी मोदी यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांबरोबर रात्रीचे जेवणही घेतले. तब्बल पाऊणतास हा कार्यक्रम रंगला होता. यावेळी सुरू असलेल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान मोदींनी ट्रम्प आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधावर भाष्य केले. यावेळी उपस्थितांपैकी एकाने मोदींना ट्रम्प यांच्याशी संबंध कसे वाढवणार, याबद्दल विचारले असता मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्यात चांगले सख्य असल्याचे म्हटले. यावेळी डेमोक्रॅटस आणि रिपब्लिकन सत्ताधाऱ्यांचा भारताविषयीचा दृष्टीकोन, बराक ओबामांचे कुणाबरोबर चांगले संबंध होते, अशा अनेक प्रश्नांवरही चर्चा झाली. मात्र, सरतेशेवटी रिपब्लिकन राजवट भारतासाठी अधिक फायद्याची असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. मोदींनी यावेळी नव्वदीच्या सुरूवातीला भारत आणि अमेरिका परराष्ट्र संबंधातील खडतर कालावधीचाही उल्लेख केला. जम्मू-काश्मीरचा वादग्रस्त भूभाग म्हणून उल्लेख करणाऱ्या आणि पाकिस्तानला लष्करी पाठबळ पुरवणारे अमेरिकन राजदूत रॉबिन राफेल यांच्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. कारगिल युद्धानंतर बिल क्लिंटन यांच्या भारत भेटीमुळे अमेरिकेचा कल पाकिस्तानकडून भारताकडे झुकला, अशी आठवणही या बैठकीत सांगण्यात आली.

दरम्यान, घटक पक्षांच्या बैठकीत भाजपने नोटबंदीवरील आपल्या निर्णयावर ठाम असून याप्रकरणी माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोटबंदीच्या निर्णयावर देशातील जनता सरकारच्या पाठिशी असून विरोधी पक्षाच्या दबावासमोर झुकण्याची काहीच गरज नसल्याचा सूर बैठकीतून निघाला. याचदरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल समवेत अनेक विरोधी पक्षांनी बैठकीचे आयोजन करून बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला नोटबंदीसह विविध मुद्द्यांवर घेरण्याची रणनीती आखली.

नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले असून या निर्णयाचा पुन्हा विचार केला जाणार नाही. देशाचा कल मोदी सरकारच्या बाजूने आहे सहकारी पक्षांनीही याबाबत सकारात्मकता दाखवली, असल्याचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर म्हटले. भविष्यातील मोठा फायदा लक्षात घेऊन देशातील जनता हा तात्कालीक त्रास सहन करण्यास तयार असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले. विरोधी पक्ष करत असलेले आरोप फेटाळत त्यांना योग्य वेळी उत्तर देण्यात येईल असेही त्यांनी सुनावले. पंतप्रधानांनी सर्व घटक पक्षांचे आभार मानले असून हा माझ्या एकट्याचा निर्णय नसून याचे सर्व श्रेय तुम्हा सर्वांचे असल्याचे त्यांनी सांगितल्याचे नायडू यांनी म्हटले.