राहुल गांधींची मोदींवर टीका; केरळच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण नाकारण्याशी संबंध नसल्याचे गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
केरळमधील कार्यक्रमापासून खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच दूर ठेवण्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केरळमध्ये झालेल्या पहिल्याच कार्यक्रमापासून राज्याचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांना दूर ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी लोकसभेत केला. त्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला. पंतप्रधानपदाचा वापर नरेंद्र मोदी ‘राजकीय सूड’ उगवण्यासाठी करीत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केला. केरळचे माजी मुख्यमंत्री आर. शंकर यांच्या प्रतिमा अनावरण सोहळ्याचे चंडी यांना पाठवलेले निमंत्रण परत घेण्यात आले होते. त्यामुळे केवळ चंडी यांचाच नव्हे तर समस्त केरळवासीयांचा अवमान झाल्याचे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या आरोपांचे खंडन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. मुख्यमंत्री चंडी यांना दिलेले निमंत्रण परत घेण्याचा निर्णय आयोजक संस्थेचा होता. तो संस्थेचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून राजनाथ सिंह यांनी यावर बोलण्याचे टाळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरूनच संस्थेने चंडी यांना पाठवलेले निमंत्रण परत घेतले, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला. आर. शंकर काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष होते. मोदी संघराज्य पद्धत, राज्य-केंद्र संबंधांवर लांबलचक भाषणे देतात, प्रत्यक्षात त्यांची कृती त्या विपरीत आहे.त्यांच्या समुदायाशी संबधित संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. लोकसभा निवडणुकीत या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वास समर्थन दिले होते. आता लोकसभेतील विजयानंतरही मोदी द्वेषाचे राजकारण करीत असल्याचे सुर्जेवाला म्हणाले.

वाद नेमका कशाने!
‘श्री नारायण धर्म परिपालन’ या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या संस्थेच्या कार्यकारिणीने एकमताने चंडी यांना कार्यक्रमात न येण्यासाठी ठराव मंजूर केला. तो त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे संस्थेने सांगितल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. लोकसभेत यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनीदेखील स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. खुद्द ओमान चंडी यांनीच एका पत्राद्वारे कार्यक्रमास उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती, असा गौप्यस्फोट रूडी यांनी केला. मात्र काँग्रेस सदस्यांनी निदर्शने सुरूच ठेवली. या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज स्थगित केले होते.

केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांना पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमातून डावलल्याने केरळमधील काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी संसद परिसरात निदर्शने केली.