परिवार संघटना व केंद्र सरकारमध्ये ‘एक्स्चेंज ऑफ नोट्स’ होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीनदिवसीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन वा आढावा घेतला जाणार नाही, असे स्पष्टीकरण संघाच्या प्रचार विभागाचे प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत उपस्थित राहणार आहेत. मात्र दिवस व वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. एरवी परिवारातील संघटनांसाठी ‘समन्वय बैठक’ घेणाऱ्या संघाने यंदा जानेवारीपासून ‘एक्स्चेंज ऑफ नोट्स’साठी बैठक आयोजित करण्याची परंपरा सुरू केली आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान ही बैठक दिल्लीत होणार आहे.
वैद्य म्हणाले की, या बैठकीत जनगणना, पटेल आरक्षण आदी मुद्दय़ांवर चर्चा होईल. देशभर प्रवास करणाऱ्या संघ परिवारातील संघटनांच्या प्रमुखांकडून माहिती एकत्र करण्यात येईल. भाजप सत्तेत आल्यानंतर संघविस्तारात वाढ झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी केरळमधील संघकामाचे उदाहरण दिले. केरळमध्ये संघाचे चांगले काम आहे. मात्र तेथे भाजप कधीही सत्तेत आला नाही. बैठकीत एकूण ९३ कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यापैकी २५ जण थेट संघाशी संबंधित आहेत.