पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात महिला आणि शोषित वर्गाला स्थान नाही. त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान आहे. मोदींसाठी मेहुल चोक्सी, नीरव मोदी, अनिल अंबानी, ललित मोदी हीच लोक ‘भाई’ आहेत. ते शेतकरी आणि कामगार वर्गाला कधीच ‘भाई’ म्हणत नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी सोमवारी मध्य प्रदेशमधील दौऱ्याला सुरुवात केली. पहिल्याच सभेत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. शोषित व महिलांसाठी पंतप्रधानांच्या ह्रदयात स्थान नाही. त्यांच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान आहे. जी लोकं सूटबूटमध्ये असतील त्यांनाच मोदी ‘भाई’ म्हणतात. मेहुल भाई, नीरव भाई, अनिल भाई, ललित भाई हे त्यातलेच आहेत. ते कधीच शेतकरी आणि कामगारांचा उल्लेख ‘भाई’ म्हणून करत नाही. ते गरिबांना ‘भाई’ म्हटल्याचे कधी ऐकले का?, असा सवाल त्यांनी विचारला. शेतकऱ्यांचे कर्ज मार्फ करावे, असे आवाहन मी स्वत: नरेंद्र मोदींना केले होते. पण नरेंद्र मोदींनी त्याबाबत मौन बाळगले, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी ट्विटरवरुनही मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, चौकीदाराने भाषणं खूप केली. पण ते पोटाचं आसन विसरले. योगासन खूप केली, पण जनतेला अन्नधान्य देण्यास ते विसरले, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी दातिया येथील पीतांबरा शक्तिपीठात देवीचे दर्शन घेतले.