आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने कर्नाटकातील वातावरण पूर्णत: बदलले असून शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वादळी सभांनी कमालीची रंगत आणल्याचे दिसून येत आहे. बेंगळुरूच्या ग्रामीण भागात प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींनी मोदींवर उपहासात्मक शैलीत टीका केली. मोबाइल फोनमध्ये तीन मोड असतात. वर्क मोड, स्पीकर मोड आणि एअरप्लेन मोड. मोदी यातील स्पीकर आणि एअरप्लेन मोड या दोनच मोड वापरतात. वर्क मोडचा वापर ते कधी करतच नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.

वंदे मातरमचा अपमान करणारे, देश कसा सांभाळणार? अमित शाहंचा सवाल

दरम्यान, राहुल गांधी यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात कोलार येथे सायकल रॅली काढली. त्यांनी स्वत: सायकल चालवत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. तत्पूर्वी, भालकी येथे झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी आणि राज्यातील सिद्धरामय्या सरकारवर टीकास्त्र सोडले. देशावर जेव्हा-जेव्हा संकट येते, तेव्हा राहुल गांधी इटलीला पळून जातात, असा टोला त्यांनी लगावला. भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वसामान्य नागरिकांचा लुटलेला पैसा पुन्हा वसूल करून तो जनतेच्या कल्याणार्थ वापरला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

‘देशावर जेव्हा संकट येते तेव्हा राहुल गांधी इटलीला पळून जातात’

तर भाजपाचे नेते अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली. ज्या व्यक्तीकडे वंदे मातरमवेळी उभे राहण्यासाठी वेळ नाही, ते या देशाचे भले करू शकणार नाही, असा टोला शाह यांनी राहुल गांधी यांना लगावला.