आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षामध्ये आणखी एका गोष्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. जगभरातले टॉप सीईओ आणि सत्ताधीश एकत्र येणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदी सहभागी होणार आहेत. गेल्या २० वर्षांमधील या परिषदेत भारतीय पंतप्रधानांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकंच नाही तर मोदी या परिषदेत मुख्य पाहुणे म्हणून सन्मानिले जाणार असून हा मान मिळणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.

दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचा वरचश्मा राहील अशी चिन्हे आहेत, कारण यात सहभागी होणाऱ्या भारतीय उद्योजकांची व सरकारी अधिकाऱ्यांची संख्या शंभरावर असणार आहे. भारताची आर्थिक स्थिती व भारतामधील गुंतवणुकीच्या संधी या विषयांभोवती अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून भारतामध्ये परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मोदी या परिषदेचा चांगला उपयोग करतील असे तज्ज्ञांचे मत आहे.

जानेवारी महिन्यात ही परिषद होत असून प्रजासत्ताक दिनही याच महिन्यात असल्याने भारतीय पंतप्रधान परिषदेला जाण्याचे टाळत आले आहेत. मात्र, अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून २३ ते २६ जानेवारी असा स्वित्झर्लंडचा हा दौरा करण्याचे मोदींनी ठरवले आहे. ते २६ जानेवारी रोजीच परततील आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आसियानच्या नेत्यांचे स्वागत नवी दिल्लीत करतील.

याआधी केवळ दोन पंतप्रधानांनी पी. व्ही. नरसिंह राव व एच डी देवेगौडा या दोघा पंतप्रधानांनी दावोसच्या या परिषदेत सहभाग घेतला होता. त्यातली शेवटची भेट १९९७ ची असून या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणारे नरेंद्र मोदी हे २० वर्षांतील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

मोदींच्या बरोबर ३० ते ४० सरकारी अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच मोठ्या संख्येने भारतीय उद्योजकही या परिषदेत सहभागी होणार आहेत. भारतामध्ये असलेल्या गुंतवणुकीच्या संधी विदेशी गुंतवणूकदारांसमोर मांडण्यासाठी ही परिषद म्हणजे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. २०१९ च्या निवडणुकांपूर्वी भारतामध्ये तेजीचे चित्र आणायचे असेल आणि अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर विदेशी गुंतवणूक येणं गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर दावोसची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.