भारत-आफ्रिका शिखर बैठक २६ ऑक्टोबरला आयोजित करण्यात येत असून, त्यात भारत यजमानपद भूषवत असल्याचा अभिमानच वाटतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आफ्रिकेतील देशांबरोबरचे संबंध व व्यापार वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. या शिखर परिषदेत भारत यजमान आहे याचा अभिमान वाटतो. भारत व आफ्रिकी देशातील संबंधाला आगामी काळात महत्त्व आहे. एकूण ५४ आफ्रिकी देशांचे प्रतिनिधी या वेळी येणार असून ४० देशांच्या प्रमुखांचा त्यात समावेश आहे. आफ्रिकी समुदाय शक्तिशाली असून हे देश या चार दिवसांच्या शिखर बैठकीत सहभागी होत आहेत. भारताचा आफ्रिकेबरोबरचा व्यापार ७५ अब्ज डॉलर्सचा असून ७.४ अब्ज डॉलर्सचे विकास प्रकल्प चार वर्षांत मंजूर करण्यात आले आहेत. भारताने ४१ आफ्रिकी देशांत १३७ प्रकल्प राबवले आहेत. व्यापार वाढ हा या शिखर बैठकीचा प्रमुख उद्देश आहे व त्यात आफ्रिकेतील ४०० व्यापार प्रतिनिधी मंडळे व भारतीय व्यापार महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. टांझानिया, सुदान, मोझांबिक, केनया, युगांडा या देशांत तेल व नैसर्गिक वायूचे साठे असून भारताला तेथे गुंतवणुकीची संधी आहे. ऊर्जा, आरोग्य व पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान व नवप्रवर्तनात सहकार्याची संधी आहे.