पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी सार्क परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला जाणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २००४ मध्ये सार्क परिषदेसाठीच अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी इस्लामाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली. सुषमा स्वराज सध्या ‘हार्ट ऑफ एशिया’ या पाचव्या मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादमध्ये आल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या रूपाने एखाद्या भारतीय मंत्र्याने २०१२ नंतर पाकिस्तानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०१२मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा उदारीकरणाचा करार झाला होता.
तत्पूर्वी भारत व पाकिस्तान या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची रविवारी बँकॉकमध्ये दहशतवाद, जम्मू- काश्मीर व इतर द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा होऊन त्यांनी संवादप्रक्रिया ‘सकारात्मकरीत्या’ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता