सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेला मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीमध्ये तब्बल ५,३६७.१४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. देशाच्या बॅंकिंग इतिहासात एका तिमाहीमधील हा सर्वांत मोठा तोटा आहे. थकीत कर्जांचे प्रमाण आवाक्याबाहेर गेल्यामुळे बॅंकेला तोटा सहन करावा लागला आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीची आकडेवारी बुधवारी जाहीर कऱण्यात आली. त्यामध्ये बॅंकेला तोटा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षामध्ये चौथ्या तिमाहीत बॅंकेला ३०६.५६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. पण मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बॅंकेचे उत्पन्न १३,४५५.६५ कोटींवरून १३,२७६.१९ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. उत्पन्नामध्ये १.३३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचवेळी बॅंकेच्या थकीत कर्जांमध्ये तीन पट वाढ झाली आहे. थकीत कर्जांचा आकडा १०,४८५.२३ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये तो ३८३४.१९ कोटी इतका होता. थकीत कर्जांमध्ये १२.९० टक्के इतकी वाढ झाली आहे.
मार्चमध्ये संपलेल्या पूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता बॅंकेला ३,९७४.३९ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये बॅंकेने ३०६१.५८ कोटी इतका नफा कमावला होता.