पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) चुना लावून भारत सोडून पळून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे आणखीन अवघड होऊन बसले आहे. कारण, अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारी काही माध्यमांतील वृत्तांतून हा दावा करण्यात आला होता की, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अँटिग्वा सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.

मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता हे दोघेही अनुक्रमे अँटिग्वा आणि किट्स या देशांमध्ये शरण गेले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी कॅरेबिअन बेटांवर जाणार होते. त्यासाठी भारताचे हे अधिकारी एक बोईंग विमान घेऊन जाणार होते.

मात्र, एका वृत्तवाहिनीवर बोलताना अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी सांगितले की, चोक्सी आता अँटिग्वाचा नागिरक आहे आणि इथले सरकार त्याची नागरिकता हिसकावून घेऊ शकत नाही. या अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले की, भारत सरकारचे कोणी अधिकारी आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी आले असल्याची आपल्याला माहिती आपल्याला नाही.