‘छोटा मोदी’ हा कसला शब्द प्रयोग? एखाद्याचे वर्णन करताना अशी भाषा वापरल्यास त्यावर भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी निरव मोदी हा परदेशात पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतातना त्याला ‘छोटा मोदी’ असे संबोधले होते. ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली असून एखाद्या आरोपीच्या संदर्भात असा शब्द प्रयोग केल्यास त्याच्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


प्रसाद म्हणाले, निरव मोदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाओसमध्ये भेट घेतली होती. निरव दाओसमध्ये स्वतःच्या खर्चाने आला होता. तसेच तो सीआयआय ग्रुप फोटो इव्हेंटसाठी उपस्थित होता. त्याचा आणि मोदींचा संबंध नसल्याचे प्रसाद यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले.

प्रसाद म्हणाले, काँग्रेस आता फोटोचे राजकारण करीत असून त्यांनी हे बंद करावे. आमच्याकडे मेहुल चोक्सी सोबतचे काँग्रेस नेत्यांचे अनेक चांगले फोटो आहेत. मात्र, आम्हाला इतक्या खालच्या पातळीवर यायचे नाहीए. त्यामुळे काँग्रेसने आपलो हे फोटोचे राजकारण त्वरीत बंद करावे असे त्याने म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा तपास सुरु असून यातील आरोपींना कोणालाही सोडणार नाही. यावेळी काँग्रेसच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची आठवण करुन देत, ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडं फेकू नयेत अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.