संयुक्त पुरोगामी सरकारच्या कारकीर्दीवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजपच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेबाबत काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मोदींच्या राजवटीत लोकपाल, केंद्रीय दक्षता आयोग याखेरीज इतर महत्त्वाच्या प्रमुखांच्या नियुक्त्या झाल्या नसल्याची टीका काँग्रस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली आहे.
सरकार जर कार्यक्षम असल्याचा दावा करत आहे मग या नियुक्त्या का झाल्या नाहीत असा सवाल त्यांनी केला. मोदींच्या हातात सर्व निर्णय एकवटल्याने निर्णय घेण्यास उशीर होत असल्याचा आरोप त्यांनी
केला. जवळपास १२ केंद्रीय विद्यापीठांमध्ये अजून कुलगुरू नियुक्त केलेले नाहीत त्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ७६ संयुक्त सचिवांच्या नियुक्त्याही प्रलंबित असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. पंतप्रधान मात्र आपण जलद निर्णय घेत असल्याचा आव आणतात, प्रत्यक्षात देशवासीयांची तसेच जगभरातील लोकांचीही फसवणूक करत असल्याची टीका शर्मा यांनी केली.