आमंत्रणाचा स्वीकार; पोलंडचे राजदूत हिंदीतून भाषण करणार

नवी दिल्ली : दिल्लीत बुधवारी होणाऱ्या शिवजयंती राष्ट्रोत्सवात विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होणार आहेत.  इस्रायल, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस या दहा देशांच्या राजदूतांनी शिवजयंती सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.

त्यापैकी पोलंडचे राजदूत हिंदीतून भाषण करतील. शिवजयंती राष्ट्रोत्सवाचे यंदाचे तिसरे  वर्ष असून या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार दिला जाणार असून पहिला पुरस्कार बीव्हीजी उद्योग समुहाचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना प्रदान केला जाईल, अशी माहिती खासदार संभाजी राजे यांनी सोमवारी दिली.

शाहिरी, पोवाडे, शौर्यगाथा, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण असा शानदार कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रोत्सवाच्या पहिल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नौदलप्रमुख सुनील लांबा तर, दुसऱ्या वर्षी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्ष सुमित्रा महाजन सहभागी झाल्या होत्या.

‘राज्य सरकारने अर्थसाह्य करावे’

शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता वा मराठी लोकांपुरता सीमित न ठेवता तो संपूर्ण राष्ट्राचा उत्सव झाला पाहिजे, या उद्देशाने दिल्लीत शिवजयंती सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. जगभर शिवरायांची महती पोहोचली पाहिजे, यासाठी राजदूतांना निमंत्रण देण्यात आले असल्याचेही खासदार  संभाजी राजे  यांनी सांगितले. दरवर्षी होणाऱ्या सोहळ्याला राज्य सरकारने अर्थसाह्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.