आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात असलेले अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा असेच बिनधास्त विधान केले आहे. हे विधान सध्या देशात राम मंदिरावरुन सुरु असलेल्या राजकारणावर आहे. यावरुन त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एसी खोल्यांमध्ये बसून राम मंदिरावर सध्या राजकारण सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


अभिनेते प्रकाश राज हे बंगळूरू सेन्ट्रल मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सध्याच्या देशातील विविध राजकीय घडामोडींवर ते बारीक लक्ष ठेऊन असतात, तसेच याबाबत आपले मतप्रदर्शनही करतात. नुकतेच त्यांनी राम मंदिरावरुन होणाऱ्या राजकारणावर भाष्य केले आहे.

प्रकाश राज माध्यमांशी बोलताना म्हणाले, राम मंदिरावरुन लखनऊ आणि दिल्लीतील बंद एसी खोल्यांमध्ये बसून राजकारण होत आहे. माध्यमांतील लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी अयोध्येत जाऊन तिथली परिस्थिती पहावी. अयोध्येतील गल्यांमध्ये लोक कसे जगत आहेत. भाजपा आणि मोदींना असेच राम राज्य आणायचे आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

नुकत्याच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांतील निकालावरुन प्रकाश राज यांनी भाजपावर निशाणा साधला होता. ट्विट करुन त्यांनी भाजपाच्या कामगिरीवर सडकून टीका केली होती.