गेल्या वर्षी मुंबईत वीजपुरवठा सायबर हल्ल्यांमुळे खंडित झाला नव्हता, तर मानवी चुकीमुळे हा प्रकार घडला, असे स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी मंगळवारी केले.
गतवर्षी सायबर हल्ले झाले हे खरे, पण चीनच्या या हल्ल्यांमुळे मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असे त्यांनी सांगितले.
वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तान किंवा चीन यांनी सायबर हल्ले केल्याचे पुरावे नाहीत. काही लोक या वीज खंडित होण्याच्या घटनेमागे काही विशिष्ट गट असल्याचे सांगत असले तरी तसे कुठलेही पुरावे नाहीत. चीननेही या आरोपाचा इन्कार केला आहे.
भारतात उत्तर व दक्षिण भागातील वीज वितरण केंद्रांवर सायबर हल्ल्याचे काही प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नव्हते. कारण कुठलेही ‘मालवेअर’ संचालन प्रणालीपर्यंत पोहोचू शकत नाही, असे सिंह म्हणाले.
चीनच्या मालवेअर हल्ल्यामुळे मुंबईतील वीज खंडित झाल्याच्या वृत्ताचे केंद्रीय वीज मंत्रालयाने कालच खंडन केले होते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासात असे म्हटले होते की, चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबईत गेल्या वर्षी १२ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे करोना काळात रुग्णालयांची वीज गेल्याने रुग्णांचे हाल झाले. या अभ्यासात पुढे असेही म्हटले होते की, चिनी हॅकर्स गटांनी भारताच्या वीज प्रणालीत मालवेअर सोडून वीज खंडित केली होती. महाराष्ट्र सरकारने या वृत्तास काही प्रमाणात दुजोरा दिला आहे. सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशी अहवालानुसार मुंबईत गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये वीज खंडित होण्याचा प्रकार म्हणजे सायबर घातपात होता. देशमुख यांनी मंगळवारी वार्ताहरांना सांगितले की, सायबर सुरक्षेचा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून तो देशातही आहे. या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. आपण केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्याशी बोललो असून त्यांनी त्याबाबत सविस्तर माहिती मागितली आहे, आपण सतत सतर्क राहणेच जास्त गरजेचे आहे. दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी सांगितले की, मुंबईतील वीजपुरवठा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खंडित झाल्याबाबतचा अहवाल बुधवारी विधानसभेत मांडणार आहोत.
मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याची चौकशी दोन पथकांनी केली होती व त्यांनी अहवालही सादर केला. वीजपुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला हे कारण नव्हते, तर मानवी चुकीमुळे तसे झाले होते. एका पथकाने सायबर हल्ला झाला असे म्हटले होते, पण त्याचा मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
– आर. के. सिंह, केंद्रीय ऊर्जामंत्री
