देशभरात गाजलेल्या रेयान इंटरनॅशनल हत्याप्रकरणात बुधवारी ज्युवेनाईल कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्देश दिला. प्रद्युम्न ठाकुर या सात वर्षीय मुलाच्या हत्ये प्रकरणातील १६ वर्षीय आरोपीला सज्ञान मानावे आणि त्यानुसार खटला चालवा, असे निर्देश केले आहेत. त्यामुळे हा खटला आता जिल्हा व सत्र न्यायालयात हस्तांतरित करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (दि.२२) रोजी होणार आहे. गुरूग्राममधील प्रसिद्ध रेयान शाळेत सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्येनंतर देशभरातील शाळांमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

आरोपीला अल्पवयीन न मानता सज्ञान मानून त्याच्यावर खटला चालवावा, अशी मागणी सीबीआय व प्रद्युम्नच्या आई-वडिलांनी केली होती. न्यायालयाने सीबीआयच्या मागणीचा विचार करत हे निर्देश दिले.

संपूर्ण देशात खळबळ उडवून दिलेल्या या हत्येप्रकरणी पहिल्यांदा स्कूल बसच्या कंडक्टरला अटक करण्यात आली होती. नंतर सीबीआयच्या तपास पथकाने अकरावीत शकणाऱ्या आरोपीला अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच आरोपी विद्यार्थ्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.