प्रयागराज येथे कुंभ मेळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी दुर्दैवी घटना घडली आहे. येथील संगम तटावर उभारण्यात आलेल्या दिंगबर आखाड्याच्या तंबुंना भीषण आग लागली. अग्निशामक दलाने घटनास्थळी त्वरीत धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीत तंबूतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. मंगळवारपासून शाही स्नानाने कुंभ मेळ्यास औपचारिक सुरूवात होणार आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कुंभ मेळा स्थळावरील सेक्टर १६ येथील दिंगबर आखाड्याच्या तंबुत आज (सोमवार) अचानक आग लागली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या साधु-संतामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान सुमारे एक डझन तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरच्या गळतीमुळे मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकल्याचे सांगण्यात येते. आगीमुळं संपूर्ण तंबू जळून खाक झाले असून आमचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती एका साधूने दिली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंगळवारपासून कुंभ २०१९ ची सुरूवात होणार आहे. यावर संपूर्ण देशासह जगाची नजर टिकून आहे. कुंभच्या भव्य आयोजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठी तयारी केली आहे. या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो साधू-संन्यासी प्रयागराज येथे येत आहेत. संगम तटावर चहुबाजूंनी देशभरातून आलेल्या विविध आखाड्यांचे तंबू सज्ज झाले आहेत.