सुप्रीम कोर्टचे न्या. रंजन गोगोई हे आता नवे सरन्यायाधीश (CJI) असणार आहेत. राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ३ ऑक्टोबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे २ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. दीपक मिश्रा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रंजन गोगोई यांचे नाव केंद्र सरकारला पाठवले होते. ज्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.

रंजन गोगोईंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होते आहे. सर्वोच्च न्यायालयतील ज्येष्ठता क्रम लक्षात घेता न्या. मिश्रा यांच्यानंतर रंजन गोगोई हे दुसऱ्या स्थानी आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश पदाची जबाबदारी दिली जाते.

न्या. रंजन गोगोई हे २००१ मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये ते पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. एप्रिल २०१२ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली. आता त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी करण्यात आली आहे.