राष्ट्रपतींची अभिभाषणात ग्वाही; गांधी विचारांचे स्मरण 

नवी दिल्ली : जाती, धर्मविरहित भेदभावमुक्त समाजाच्या विकासाचे ध्येय केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारने ठेवले असून याच मार्गाने वाटचाल करत नवा सशक्त भारत निर्माणाचे स्वप्न साकार केले जाईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांसमोर केलेल्या अभिभाषणात व्यक्त केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा अभिभाषणात समावेश केला. देशातील सर्वात कमजोर व्यक्तीपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकार पाच वर्षे कार्यरत राहील. संसद सदस्यांनीही गांधीजींच्या या विचारांचे आचरण करावे, असा सल्ला कोविंद यांनी दिला.

दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागांचा विकास, महिला सबलीकरण, देशाची सुरक्षा, शेजारी राष्ट्रांशी संबंध, चांद्रयान, अंतराळातील झेप अशा सामाजिक, आर्थिक, राष्ट्रवाद, वैज्ञानिक विकासाच्या चौफोर मुद्दय़ांची पेरणी करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या पुढील पाच वर्षांतील धोरणांचा रोडमॅप कोविंद यांनी अभिभाषणाद्वारे मांडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या सरकारने दहशतवादाविरोधात केलेले सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ल्याला एअर स्ट्राइकद्वारे दिलेले चोख उत्तर, नक्षलवादाविरोधात केलेली कारवाई या मोदी सरकारच्या यशोगाथेचा उल्लेख कोविंद यांनी करताच सत्ताधारी पक्षानेच नव्हे तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. त्यात यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचाही समावेश होता. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे राफेल लढाऊ  विमाने याच वर्षी हवाई दलात सामील होतील असे राष्ट्रपती म्हणताच सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिल्या रांगेत बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मात्र राफेलच्या मुद्दय़ाला कोणताच प्रतिसाद दिला नाही.

राष्ट्रपती कोविंद यांनी महिला सबलीकरणाचा विशेषत्वाने उल्लेख केला. तिहेरी तलाक बंदी विधेयक दोन्ही सदनांत संमत करण्याची विनंती सदस्यांना केली. १७ व्या लोकसभेत सर्वाधिक ७८ महिला सदस्य निवडून आले असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले.

देशावर ओढवलेले जलसंकट आणि शेती क्षेत्रातील समस्येवरही कोविंद यांनी प्रकाश टाकला. तलाव, विहिरी कोरडय़ा पडलेल्या आहेत. गरिबांना पिण्यासाठी पाणी नाही अशी गावागावांमध्ये दुर्लभ स्थती आहे. त्यावर मात करण्याचे ठोस प्रयत्न केले जातील. जलशक्ती हे स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले असले तरी पाणी हा राज्यांचा विषय असून सरपंच स्तरावर गांभीर्याने या समस्येकडे पाहिले पाहिजे असे कोविंद म्हणाले. शेती व उद्योग क्षेत्रासाठी केंद्राने लागू केलेल्या विविध योजनांचाही ऊहापोह त्यांनी केला. विकासाचा वेग वाढण्यासाठी आर्थिक क्षेत्रात सुधारणा केली जाईल. उद्योग सुलभीकरणासाठी कायद्यांमध्ये बदल केले जातील. कररचनेतही बदल केले जातील, असे कोविंद म्हणाले. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपप्रणीत एनडीए सरकारने सुरू केलेल्या जनधन, उज्ज्वला, सौभाग्य, मुद्रा अशा विविध कल्याणकारी योजनांचे महत्त्व पुन्हा एकदा सांगितले.

राहुल गांधी मोबाइलमध्ये गर्क

राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित होते. पण, संपूर्ण वेळ मोबाइल बघण्यात गर्क होते. पहिल्या बाकावर बसलेले राहुल गांधी सातत्याने मोबाइल पाहात होते. मेसेज वाचत होते. अन्य सदस्य राष्ट्रपतींचे भाषण गांभीर्याने एकत होते मात्र, राहुल यांनी मोबाइलवर संदेश पाहणेच अधिक पसंत केले. मधून मधून ते शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांच्याशी बोलत होते. राहुल यांची ही मोबाइल आवड दिवसभर संसदेच्या आवारात चर्चेचा विषय ठरली. अभिभाषण संपल्यावर राहुल यांनी सत्ताधारी सदस्यांशीही हस्तांदोलन केले. त्या वेळी स्मृती इराणी आणि राहुल दोघेही समोरासमोर आले पण, दोघांनीही एकमेकांकडे काणाडोळा केला.