देश अनेक प्रलंबित ध्येये गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना वादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे स्वत:ला मार्गावरून विचलित होऊ देऊ नका, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना केले.देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी कोविंद यांनी दूरदर्शनवरील भाषणाच्या माध्यमातून राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी जमावाकडून होणारी हिंसा, महिलांवरील अत्याचार आदी विषयांचा ऊहापोह करत नागरिकांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले.

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे कारण २ ऑक्टोबरला आपण महात्मा गांधीजींचा १५० वा जन्मदिन साजरा करणार आहोत. गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत रूप होते. आजच्या वातावरणात त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान अधिक गरजेचे आहे. हिंसेपेक्षा अहिंसेचा मार्ग अधिक श्रेयस आहे, असे कोविंद म्हणाले.

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर कोविंद म्हणाले की, आवडीनुसार जीवन जगण्याचा आणि त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास साधण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळण्याचा महिलांना अधिकार आहे.

देशाच्या इतिहासात एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे आहोत. भारत सध्या अनेक ध्येये साध्य करण्याच्या उंबरठय़ावर आहे. सर्वाना वीज पुरवणे, गावे हागणदारीमुक्त करणे, सर्वाना निवारा पुरवणे आणि गरिबीचे निर्मूलन करणे या बाबी शक्य आहेत. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर नागरिकांनी स्वत:ला वादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ देता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला.

देशाच्या नागरिकांना अन्न सुरक्षा प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या सैनिक आणि पोलिसांच्या योगदानाची कोविंद यांनी आठवण करून दिली आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ पदवी घेणे हे नसून त्यातून जीवन समृद्ध करणे हे आहे, असे ते म्हणाले.