महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी प्रारंभ झालेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी न होणाऱ्या दिल्ली भाजपच्या नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खप्पामर्जी झाली आहे.
‘स्वच्छ भारत’ अभियानात सक्रिय सहभाग न घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांना कानपिचक्या दिल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतरही दिल्लीत भाजप नेते व कार्यकर्ते सक्रिय झालेले नसल्याने मोदी यांनी सोमवारी थेट उपाध्याय यांना फोनवरून खडसावले. खुद्द मोदींनीच फोन केल्यामुळे प्रदेश भाजपचे नेते, कार्यकर्ते गल्लीबोळात ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी फिरताना दिसत आहेत. दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्य़ात दिवसातून दोन वेळा स्वच्छता कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
मोदींनी देशवासीयांना स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत असताना दिल्लीत मात्र जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दिल्लीतील तीनही महानगरपालिकांनीदेखील या अभियानात फारसा उत्साह दाखवला नाही. शिवाय मोठमोठय़ा वसाहतींमध्ये कचरा उचलण्याची यंत्रणा कार्यान्वित नाही. या सर्व तक्रारी सोशल नेटवर्किंग साइट्सवरून दिल्लीकरांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या. त्याची दखल घेत पंतप्रधान मोदी यांनी उपाध्याय यांनाच दूरध्वनी करून विचारणा केली. प्रत्येक जिल्ह्य़ात दिवसातून दोनदा स्वच्छता अभियानासाठी भाजप नेते, कार्यकर्ते फिरणार आहेत. प्रदेश भाजपने केलेल्या नियोजनानुसार भाजप आमदार, खासदार, नगरसेवकांची वेगवेगळी टीम तयार करण्यात आली आहे. या टीमने केलेल्या कामांचा अहवाल दररोज प्रदेश कार्यालयात सादर करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष उपाध्याय यांनी दिले आहेत.