लोकसभेत मंगळवारी जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम ३७० रद्द करण्याचे व जम्मू-काश्मीरच्या पुर्नरचनेचे ऐतिहासिक विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीर व लडाख येथील नागरिकांना उद्देशून आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांनी म्हटले की, येथील युवकांना मुख्य प्रवाहात आणले जाईल, शिवाय त्यांच्या कलागुणांना व प्रतिभेस वाव देण्यासाठी त्यांना असंख्य संधी उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे तेथे सुधारणा होतील व व्यापार-उद्योगांना चालना मिळेल. रोजगाराची संधी निर्माण होतील, आपसातील मतभेद नष्ट होतील.यावेळी त्यांनी गृह मंत्री अमित शहा यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांना ट्विट करत म्हटले की, आमचे गृह मंत्री जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी सतत कार्य करत आहेत. त्यांचे समर्पण आणि अथक प्रयत्न यामुळेच हे विधेयक मंजूर होणे शक्य झाले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना गर्व व्हायला हवा की, संसदेच्या संदस्यांनी वैचारिक मतभेद विसरत त्यांच्या भविष्यासाठी चर्चा केली. याचबरोबर तेथील शांतता, प्रगती आणि समृद्धीचा मार्ग सुकर बनवला. दोन्ही सभागृहात मोठ्या बहुमताच्या फरकाने हे विधेयक मंजूर झाल्याने या निर्णयाला किती मोठ्याप्रमाणात पाठींबा होते हे दिसते.

पंतप्रधान मोदींनी हे देखील म्हटले की, मी जम्मू-काश्मीरमधील बंधू-भगीनींच्या धैर्याला आणि जबरदस्त इच्छा शक्तीला सलाम करतो. अनेक वर्षे काही स्वार्थी तत्वांच्या आधारे त्यांच्या भावनेशी काही जणांकडून खेळण्यात आले, त्यांना भरकटवण्यातही आले, येथील विकासाकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, आता जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा लोकांच्या जाचापासून मुक्त आहे. एक नवी पहाट, एक चांगले भविष्य येथील नागरिकांची वाट पाहत आहे.

यावेळी त्यानी लडाखच्या लोकांचे विशेष अभिनंदनही केले, ते म्हणाले की, मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की, केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची त्यांची अनेक वर्षांची मागणी आच पूर्ण झाली आहे. या निर्णयामुळे लडाखच्या विकासाला चालना मिळेल. येथील लोकांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येईल.