सरकारी योजना राबवण्यासाठी वीज आवश्यक आहे त्यामुळे २०२२ पर्यंत देशातील खेडय़ांना चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, एकूण १८ हजार खेडय़ात अजूनही वीज नाही व येत्या एक हजार दिवसात या गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे आदेश आपण दिले आहेत. २०२२ मध्ये देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन असून त्यावेळी सर्व घरे अंधारमुक्त झाली पाहिजेत असे आपले स्वप्न आहे. पुनर्नवीकरणीय वीजस्रोत धरून आपण ३ लाख मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता प्राप्त केली आहे. २०१५-१६ मध्ये ११३७ अब्ज युनिट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट असून २०१४-१५ मध्ये १०४८ अब्ज युनिट वीज निर्मिती झाली होती. ही वाढ ८.४७ टक्के आहे.
विजेची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असून ती दूर करण्याचा राज्यांचा प्रयत्न आहे. डिजिटल इंडिया योजना मागे पडू दिली जाणार नाही त्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाईल. लागोपाठ दुसऱ्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.