केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होणार आहे, यामध्ये काही मंत्र्यांची खातीही बदलली जाऊ शकतात. अशात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्र्यांची कामगिरी हाच जर फेरबदल आणि विस्ताराचा निकष असेल तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे पंतप्रधानपद सोडावे अशी टीका राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

मागील तीन वर्षांमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी सर्वात वाईट आहे. रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था, नोटाबंदी हे आणि असे अनेक निर्णय आहेत ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत. इतर मंत्र्यांच्या तुलनेत त्यांची कामगिरी सर्वात वाईट आहे, अशा स्थितीत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होणार आहे, अशात एआयडीएमके आणि जदयू या दोन पक्षांच्या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही पक्षांशी संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र असे काहीही घडलेले नाही या दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही नाराजी नाही अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान विस्तार आणि फेरबदलांच्या आधी कलराज मिश्र, बंडारू दत्तात्रेय, राजीवप्रताप रूडी, संजीव कुमार बालियान, फग्गन सिंह कुलस्ते आणि महेंद्रनाथ पांडे यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. उमा भारती यांच्याही राजीनाम्याची चर्चा रंगली होती.. मात्र तो घेतल्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अशा सगळ्या घडामोडींमध्येच कामगिरी हा निकष लावायचा असेल तर आधी पंतप्रधानांनी पद सोडावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.