इराण आणि अमेरिका यांच्यातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सख्खे शेजारी पैके वैरी असलेले इराण आणि इस्रायल समोरासमोर उभे ठाकले आहेत. आमच्यावर हल्ला केलात तर याद राखा, असा सज्जड दम इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इराणला दिला आहे.

इराकमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले त्यावर नेत्यानाहू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलची राजधानी जेरुसलेम येथे एका परिषदेत बोलताना नेत्यानाहू म्हणाले, “जर कोणी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.”

इराण आणि अमेरिका यांच्यातील राजकीय तणावाचे परिणाम इतर देशांनाही भोगावे लागू शकतात. त्यामुळेच भारत, अमेरिकेसह इतर देशांनी इराण, इराक आणि इतर आखाती देशांच्या हवाई क्षेत्रातून विमानांची उड्डाणेही न करण्याचा सल्ला आपापल्या विमान कंपन्यांना दिला आहे. त्यातच आता इस्त्रायलनेही उडी घेतली आहे.

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात इस्रायलने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर इस्रायल आणि इराणमधील तणाव विकोपाला गेला होता. येत्या काळात इस्रायलने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर नव्याने हल्ले चढविले तर इराणकडून त्याला प्रत्युत्तर मिळेल आणि या क्षेत्रात युद्धाचा भडका उडेल, असा इशारा त्यावेळी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला होता.