पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गरीब विद्यार्थ्यांना जेवण वाढले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थितीत होते. वृंदावनमध्ये चक्रोदय मंदिरात अक्षयपात्र फाऊंडेशनकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यासाठी विशेष होता कारण, पंतप्रधानांनी येथे शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना आपल्या हाताने ३०० कोटींव्या थाळीमध्ये जेवण वाढले. पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे.


यावेळी मोदी म्हणाले, आता बदललेल्या परिस्थितीत पोषकतेबरोबरच पुरेशी आणि चांगल्या गुणवत्तेचे भोजन मुलांना मिळावे याची काळजी घेतली जात आहे. या कामात अक्षयपात्रशी जोडलेले आपण सर्व जेवण बनवणाऱ्यांपासून जेवण पोहोचवणाऱ्यांपर्यंत या कामाशी जोडले गेलेले सर्वजण देशाची मदत करीत आहेत.

गाईला भारताची परंपरा आणि संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, सरकारने चांगल्या गोवंशासाठी अनेक पावले उचलली आहेत. आम्ही गोमातेचे कर्ज फेडू शकत नाही. गाय भारताची परंपरा आणि संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग आहे.

अक्षयपात्र फाउंडेशन एक एनजीओ आहे जी सरकारी शाळांमध्ये चालणाऱ्या मिड-डे मिल योजनेत जेवण पुरवण्याचे काम करते. या फाऊंडेशनची स्थापना २००० मध्ये झाली. या फाऊंडेशनच्या माध्यमांतून १२ राज्यांमधील १४०७ शाळांमध्ये १० लाख ६० हजार मुलांना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. २०१६मध्ये अक्षयपात्र फाऊंडेशनने तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या उपस्थितीत २०० कोटींव्या थाळीमध्ये मुलांना जेवण वाढले होते. त्यानंतर आज मोदींनी ३०० कोटींव्या थाळीत जेवण वाढले.