देशी बनावटीच्या संभाव्य करोना लशीच्या सार्वजनिक वापरासाठी ‘अंतिम तारीख’ ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या खटाटोपावर टीका झाल्यानंतर, शनिवारी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर आपण देशवासीयांची सुरक्षितता आणि हिताच्या रक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्टीकरण दिले.

लस विकसित करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने करण्याचा निर्णय जागतिक मान्यताप्राप्त नियमांनुसारच घेण्यात आला आहे. लशीची मानवी चाचणी व प्राण्यांवरील चाचणी या एकाच वेळी केल्या जाऊ  शकतात, असे समर्थन ‘आयसीएमआर’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केले आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनी आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे करोनावरील लशीवर संशोधन सुरू केले आहे. या लशीच्या मानवी चाचणीला ‘आयसीएमआर’ने परवानगी दिली असून देशातील १२ रुग्णालयांत ७ जुलैपासून ही चाचणी सुरू होईल. मात्र, ही चाचणी प्राधान्याने केली जावी, असा आदेश ‘आयसीएमआर’ने या रुग्णालयांना दिला आहे. १५ ऑगस्ट रोजी ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. पण, दीड महिन्यांत मानवी चाचणी कशी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मानवी चाचणीच्या आधीच्या सर्व संशोधन प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, आता मानवी चाचणीचा टप्पा-१ व टप्पा-२ साठी परवानगी दिली आहे. संशोधनाची प्रक्रिया लालफितीत अडकू नये, तसेच कोणतीही अत्यावश्यक संशोधन प्रक्रिया न वगळता मानवी चाचणीसाठी उमेदवारांची निवड गतीने केली जावी, एवढाच रुग्णालयांना पत्र पाठवण्यामागील उद्देश होता, असे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे.  सुरक्षितता, दर्जा, नियामक बंधने यांचे कुठेही उल्लंघन केले जाणार नाही. लसनिर्मिती संदर्भात मुद्दे उपस्थित करण्यात गैर नाही, मात्र भारतीय संशोधकांच्या क्षमतेवर शंका घेणे योग्य नाही, असेही म्हटले आहे.

‘स्वातंत्र्यदिनी घोषणाबाजीसाठी..’

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘घोषणाबाजी’ करता यावी यासाठी दीड महिन्यात लसनिर्मितीचा खटाटोप केला जात आहे, अशी टीका माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केली. तर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लालकिल्ल्यावरून मोठी घोषणा करणे एवढाच उद्देश दिसत आहे.