उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाल्याचे वृत्त आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका थोडक्यात बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. हा अपघात हापुड महामार्गावर गढमुक्तेश्वरजवळ झाला.

प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. गाड्यांचा ताफा महामार्गावर वेगाने रामपूरच्या दिशेने जात असतानाच अचानक प्रियंका गांधी ज्या गाडीत बसल्या होत्या ती गाडी तापल्याने तिच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे गाडी चालकाने अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली. गाडी अचानक थांबल्याने ताफ्यामध्ये मागून येणाऱ्या गाड्यांनी प्रियंका बसलेल्या गाडीला धडक दिली. ताफ्यामधील चार गाड्या एकमेकांना आदळल्या. मात्र या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आळं आहे.

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू, विधीमंडळाचे नेते आराधना मिश्रांसहीत अनेक नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर साडेअकराच्या सुमारास ११ वाजता बिलासपूर येथील डिबडिबा गावाला भेट देणार आहेत. येथे प्रियंका नवरीत सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. २६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिसेंमध्ये नरवरीतचा मृत्यू झाला. दिस्सीतील आयकर विभाग कार्यालयासमोर ट्रॅक्टर उलटल्याने नवरीतचा मृत्यू झाला. नवरीतचा मृत्यू गोळीबार केल्याने झाल्याचा आरोप आधी शेतकरी आंदोलकांनी केला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये नवरीतला गोळी लागली नसल्याचा खुलासा झाला.

आणखी वाचा- सुप्रिया सुळेंसह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखलं

प्रियंका यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रामपूर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पोलीस आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रियंका आणि काँग्रेस समर्थकांच्या ५०० गाड्यांचा ताफा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एसपी शगुन गौतम यांनी केवळ रामगोविंद चौधरीच येणार असल्याची माहिती देण्यात आल्याचं म्हटलं आहे. प्रियंका यांच्या दौऱ्याची माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही. या दौऱ्यावरुन दिल्लीत परत जाताना प्रियंका गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी जातील अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.