काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या सोनभद्र या ठिकाणी पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही झुकणार नाही. मी हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी आले आहे मला अटक करण्यात आली आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आलेलं नाही तर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं डीजीपींनी सांगितलं आहे. सोनभद्र या ठिकाणी जमिनीच्या वादातून १० जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुरुवारी ही घटना घडली होती. याच प्रकरणात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

प्रियंका गांधी यांना नारायणपूर या ठिकाणी अडवण्यात आलं तसंच सोनभद्र या ठिकाणी कलम १४४ अर्थात जमावबंदी संदर्भातले कलमही लागू करण्यात आले आहे. आम्ही भाजपाच्या दबावापुढे झुकणार नाही असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर याआधीही त्यांनी भाजपाच्या राज्यात झुंडशाही आणि गुंडगिरी वाढली आहे असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. मला अटक करण्यात आली आहे मी कुठेही जायला तयार आहे, मात्र मला अटक का करण्यात आली आहे हे मला समजलेले नाही. सोनभद्रमध्ये जे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी आले आहे, पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यात गैर काय असेही त्यांनी विचारले आहे.

दरम्यान सोनभद्र हत्याकांड प्रकरणात आत्तापर्यंत २९ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी सिंगल बॅरल गन, डबल बॅरल गन, रायफल हे सगळे जप्त करण्यात आलं आहे असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.