काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (१२ मार्च) गांधीनगर जाहीर सभेत भाषण केले. पद स्वीकारल्यानंतर जाहीर सभेत भाषण करण्याची प्रियंका यांची ही पहिलीच वेळ होती. काँग्रेसच्या या रॅलीत प्रियंका यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. आपल्या संयमी संयत भाषणात त्यांनी विचार करून मतदान करा असं आवाहन जनतेला केलं आहे. मात्र या भाषणाची सुरुवात सध्या चर्चेचा विषय ठरत असून खुद्द प्रियंका गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

तब्बल ५८ वर्षांनंतर काँग्रेस महासमितीची बैठक मंगळवारी गुजरातमध्ये पार पडली. सरचिटणीसपदी नियुक्त झाल्यानंतर प्रियंका गांधी प्रथमच प्रियंका गांधी या महासमितीच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. या बैठकी नंतर झालेल्या जाहीर सभेमधील आपले पहिलेच भाषण देताना प्रियंका यांनी मंचावरील सर्व मान्यवरांची नावे घेतल्यानंतर उपस्थितांना उद्देशून ‘बहनो और भाइयों’ अशी सुरुवात केली. समान्यपणे राजकीय सभांमध्ये नेते मंडळी ‘भाइयों और बहनो’ अशी सुरुवात करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या भाषणाची सुरुवात ‘भाइयों और बहनो’ अशीच करतात. प्रियंका गांधींने केलेल्या या भाषणाचा व्हिडीओ काँग्रेसच्या आसाममधील खासदार सुष्मिता देव यांनी ट्विट करुन आपल्याला भाषणाची सुरुवात आवडल्याचे म्हटले आहे. ‘गुजरातमधील प्रियंका गांधीचे भाषण अनेक अर्थांना वेगळे ठरले. त्यांनी भाषणाची सुरुवात करताना महिलांचा अधिक उल्लेख करुन नंतर पुरुषांचा उल्लेख केला हे मला खूप आवडले,’ असे ट्विट देव यांनी केले आहे.

देव यांचे हेच ट्विट कोट करत प्रियंका गांधी यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देव यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रियंका म्हणतात, ‘मला वाटलं ही गोष्ट कोणाच्या लक्षातच आली नाही.’ या एक ओळीनंतर त्यांनी डोळा मारणारा इमोन्जीही वापरला आहे.

दरम्यान कॉंग्रेसने या सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करत आपली भाषणे केली. ‘द्वेषाचे रुपांतर प्रेमात करण्याची या देशाची संस्कृती आहे. देश वाचविण्यास आपले प्राधान्य असायला हवे. त्यामुळे अधिक सजग राहून कार्यरत राहणे ही देशभक्तीच ठरेल. क्षुल्लक मुद्यांना बळी पडू नका. मोठमोठी आश्वासने देणाऱ्यांना प्रश्न विचारा आणि शहाणपणाने निर्णय घ्या,’ असं आवाहन प्रियंका गांधी यांनी मतदारांना केले. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी ‘दहशतवादाविरोधात देश संघटितपणे उभा असताना पंतप्रधान मोदी हे केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून विरोधकांच्या देशभक्तीविषयी शंका घेत देशात दुही माजवू पाहात आहेत ही निंदनीय गोष्ट आहे,’ अशा शब्दात मोदींवर टिका केली.