आजारमुक्तीचे स्वप्न लवकरच पूर्ण

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीच्या मदतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केलेली मलेरियाची लस अभूतपूर्व ठरली असून तिची परिणामकारकता ७७ टक्के आहे. आता ही लस चाचण्यांच्या पुढच्या टप्प्यात असून मलेरियामुक्तीचे स्वप्न आता दूर राहिलेले नाही.

ऑक्सफर्ड विद्यापीठ व भागीदार संस्थांनी १२ महिन्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले असून ही लस ७७ टक्के प्रभावी ठरली आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व नोव्होव्हॅक्स इनकॉर्पोरेशन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्यांनी तिसऱ्या परवान्याच्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत. ५ ते ३६ महिने वयाच्या मुलांवर चार आफ्रिकन देशात या लशीच्या चाचण्या सुरू आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था आगामी काही वर्षात २० कोटी मात्रा तयार करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सायरस व अदर पुनावाला यांनी सांगितले की, या लशीच्या निष्कर्षांबाबत आम्हालाही उत्सुकता होती. आम्ही ही लस जगाला उपलब्ध करून देणार आहोत. लॅन्सेट या नियतकालिकाने दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे जे संशोधन मांडले आहे त्यात बुर्किना फासो येथील ५-१७ महिने वयाच्या मुलांवर प्रयोग करण्यात आले. त्यांना मे २०१९ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान मलेरिया लशीच्या मात्रा देण्यात आल्या. मलेरियाने आफ्रिकेत बालमृत्यूचा दर अधिक आहे.

या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष आशादायी व अभूतपूर्व असेच आहेत. जागतिक संशोधकांच्या मते या लशीत जर प्रभाव वाढवणारा रासायनिक घटक जास्त असेल तर त्याची परिणामकारकता ७७ टक्के दिसून आली आहे. त्यानंतर कमी रासायनिक घटकाच्या परिस्थितीत त्याची परिणामकारकता ७१ टक्के दिसून आली आहे.   – हालिडू टिंटो, नानोरो येथील परोपजीवी शास्त्राचे प्राध्यापक